राम मंदिर आंदोलनात मृत्यू पावलेल्यांचा होणार सन्मान; मूर्ती बसवण्याचाही प्रस्ताव
राम मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या रामभक्तांनाही योग्य तो सन्मान दिला जावा, यावर ट्रस्टच्या बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. काही सदस्यांनी या राम भक्तांच्या मूर्ती ठिकठिकाणी बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर काहींनी अयोध्येतील रस्त्यांना आणि चौकांना त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मंदिर आंदोलनात किती राम भक्तांना जीव गमवावा लागला, याची नेमकी संख्या माहीत नाही. जवळपास पाचशे वर्षे चाललेल्या राम मंदिर आंदोलनात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. १९९० च्या दशकापूर्वी आंदोलनात प्राण गमावलेल्या रामभक्तांची अचूक माहिती मिळणेही कठीण होऊ शकते. त्यांची संख्या देखील खूप जास्त असू शकते आणि त्यामुळे सर्वांच्या मूर्ती बनवणे शक्य होणार नाही. त्यामुळेच प्राण गमावलेल्या अशा सर्व रामभक्तांसाठी स्वतंत्र मूर्ती बनवण्याची कल्पना योग्य वाटली नसल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
- आंदोलनात मारल्या गेलेल्यांची अगदी अचूक माहिती आहे, त्यांना संग्रहालयात स्थान दिले जाऊ शकते. लाइट अँड साऊंड शो आणि चित्रपट प्रदर्शनाच्या माध्यमातून या रामभक्तांच्या चळवळीतील भूमिकेचे स्मरण आणि सन्मान करता येईल. त्यांना संग्रहालयात स्थान दिले जाऊ शकते, असाही प्रस्ताव ट्रस्टकडे आला आहे.
राम मंदिर आंदोलनात प्राण गमावलेल्या रामभक्तांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.