विदर्भात मंगळवार ठरला ‘घात’वार; विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी
नागपूर :- विदर्भात मंगळवार हा विविध अपघातांमुळे ‘घात’वार ठरला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विदर्भात चोवीस तासात झालेल्या विविध अपघातात 11 मृत्यू, तर 16 जण जखमी झाले. अमरावतीत समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे.
नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पाहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटसवर दुचाकी धडकली.
तिसरा अपघात बुलढाणा जिल्ह्यात झाला. सवणा ते चिखली एसटी बसचा अपघात झाला. स्टिअरिंग रोड लॉक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते.
यवतमाळच्या वणी तालुक्यात वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर गोंदिया जिल्ह्यातील फिरायला गेलेल्या तिघांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे.