गणपतीसाठी एसटी 3100 जादा गाडय़ा सोडणार, 1700 गाडय़ांचे ग्रुप बुकिंग फुल्ल
मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र अनेकांना रेल्वेचे अद्याप कन्फर्म तिकीट मिळालेले नाही अशा चाकरमान्यांना खुशखबर आहे.
मुंबई, ठाण्यातून तब्बल 3100 गणपती विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. दरम्यान चाकरमान्यांनीही रेल्वेबरोबरच एसटीलाही पसंती दिली असून आतापर्यंत 1700 गाडय़ांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.
गणपतीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर जिह्यातून लोखो चाकरमानी कोकणात जातात. मात्र जायचे कशाने हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यातच रेल्वेने गेल्यास स्थानकापासून गावापर्यंत जाण्यासाठी हजार-बारोशे रुपयांचा भुर्दंड खिशाला लागतो. मात्र एसटीने थेट आपल्या गावात पोहोचता येते. तसेच एसटीमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असून महिलांना पन्नास टक्के सवलत आहे. त्यामुळेच चाकरमान्यांनी एसटीने कोकणात जाण्यास पसंती दिली असून त्यासाठी अगाऊ बुकिंग केले आहे. त्याची दखल घेत एसटीने 3100 गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात जाणार आहेत.