राष्ट्रवादीत हालचालींना वेग, अजित पवार गटाच्या भेटीनंतर मलिकांचा मोठा निर्णय
मुंबई, 15 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे कालच जामिनावर बाहेर आले आहेत. नवाब मलिक जामिनावर बाहेर येताच आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि रुपाली चाकणकर यांनी मलिक यांची भेट घेतली.दोन्ही गटातील नेत्यांकडून मलिकांच्या तब्येतीची विचारपूस सुरू आहे.मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाला पाठिंबा देणार अजित पवार की शरद पवार याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे तूर्तास नवाब मलिक हे आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय भूमिकेबाबत सध्या तरी मलिक कोणताही निर्णय घेणार नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून न्यूज 18 ला मिळाली आहे.मलिकांच्या भेटीवर पटेलांची प्रतिक्रिया या भेटीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी आहेत, त्यांना भेटायला आलो होतो.
16 महिन्यांनंतर त्यांना दोन महिन्यांची बेल मिळाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. भेटीदरम्यान राजकीय विषयावर एक शब्दही चर्चा झाली नाही. कालच त्यांची सुटका झाली आहे, माणुसकी म्हणून आम्ही आमच्या मित्राला भेटायला आलो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.