आनंदवार्ता! पावसाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार!
नागपूर:राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असतानाच त्याच्या पुनरागमनाचे वेध सर्वानाच आणि विशेषकरून शेतकऱ्यांना लागले आहेत. त्यामुळे पावसानेदेखील ही प्रतीक्षा संपवायचे ठरवले आहे.
राज्यात १३ ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून, आता महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर काही भागात मात्र ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळू शकतो.
पालघर, रायगड, नवी मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा पट्टा सध्या उत्तरेकडे म्हणजेच अमृतसर, कर्नाल, मेरठ, लखनौ, साबौर, गोल्परा ते नागालँडपर्यंत सक्रिय असला तरीही पुढील चार-ते पाच दिवसांत तो पुन्हा सर्वसामान्य स्थितीत येईल.