फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे हिंदीत ट्विट, दिल्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंदीत ट्विट करत भारतीयांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘भारतीय जनतेचे स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनंदन!
एका महिन्यापूर्वी पॅरिसमध्ये माझे मित्र नरेंद्र मोदी आणि मी भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष २०४७ पर्यंत भारत-फ्रान्सने नवीन महत्त्वाकांक्षा निश्चित केल्या आहेत. भारत नेहमीच फ्रान्सवर विश्वासार्ह मित्र आणि भागीदार म्हणून विश्वास ठेवू शकतो.’ असे मॅक्रॉन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Independence Day 2023)
त्याचबरोबर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज संपूर्ण देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनार, सुतार, गवंडी, अवजारे आणि हातकाम करणाऱ्या वर्गाला नवी ताकद देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली. भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी, १५ ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि त्यांनी राष्ट्राला संबोधित केले.
येत्या पाच वर्षांत देश पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. गरिबीतून बाहेर आलेले १३.५ कोटी लोक मध्यमवर्गाची ताकद बनत आहेत. जेव्हा गावाची ताकद वाढते तेव्हा शहरांची आर्थिक अर्थव्यवस्था झपाट्याने वाढते. हे बळ देऊन आम्हाला पुढे जायचे आहे, असेही मोदी म्हणाले.
पीएम मोदींचे ९० मिनिटांचे भाषण
यावेळी पंतप्रधानांनी ९० मिनिटांचे भाषण केले. ७६ व्या स्वातंत्र्यदिनी पीएम मोदींनी ८३ मिनिटे भाषण केले होते. २०१५ मध्ये त्यांनी ८६ मिनिटांचे भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वात लांब भाषणाचा विक्रम मोडला होता. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून १० वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यांनी केवळ एकदाच एका तासापेक्षा कमी वेळ भाषण केले आहे. २०१७ मध्ये स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे भाषण केवळ ५६ मिनिटांचे होते. हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात छोटे भाषण आहे.