ताडदेवमध्ये वृद्ध महिलेची हत्या
मुंबई : दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये चोरीच्या प्रयत्नांतून एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडदेव मेन रोडवरील युसूफ मंझिलमध्ये राहणाऱ्या सुरेख मदन अग्रवाल नामक सत्तर वर्षीय महिलेची दरोडेखोराच्या हेतूने आलेल्या ४ ते ५ जणांकडून हत्या करण्यात आली.
हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेच्या घराची काही जणांकडून रेकी करण्यात आल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत राज्य सरकारच्या वतीने चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन या आरोपींचा शोध सुरु आहे.या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली असून युसुफ मंझिलमध्ये राहणाऱ्या वृध्द पती पत्नीच्या घरात शिरून त्यांना बांधून ठेवण्यात आले. चिकटपट्टी, कापसाच्या बोळे तोंडात टाकल्याने श्वास कोंडला गेल्याने सदरील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस व गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.