पाकिस्तानी संघाला भारतात विशेष ट्रीटमेंट ? अतिरिक्त सुरक्षा? मोदी सरकार म्हणालं, ‘पाकिस्तानचं नाही तर…’
भारतामध्ये या वर्षाच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संघांची घोषणा केली जात आहे.
या स्पर्धेला काही महिने वेळ असला तरी संघांची बांधणी आणि इतर प्रयोगांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेवरुन मोठा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेबद्दल पीसीबीने चिंता व्यक्त केली आहे. मात्र भारत सरकारने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या या मागणीसंदर्भात भाष्य करताना पाकिस्तानकडून सध्या काहीही सांगितलं जात असेल किंवा यापुढे काहीही दावे केला जात असले तरी त्याला फारसं महत्त्व नाही. येथे विश्वचषक खेळण्यासाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाकिस्तानी संघासाठी विशेष सुरक्षेची कोणतीही तरतूद केली जाणार नाही असं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानी बोर्डाची आडमुठी भूमिका
भारतामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यावरुन पाकिस्तानकडून अनेक दावे, प्रतिदावे करण्यात आले आहेत. कारण नसताना नको ती खुसपटं काढत पाकिस्तानकडून भारतात खेळण्यासंदर्भात आक्षेप घेतले जात होते. आधी पाकिस्तानने संघाला भारतामध्ये पाठवण्यास नकार दिला. हे प्रकरण अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे गेलं होतं. याच गोंधळामुळे स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी उशीर झाला. वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या ठिकाणावरुन आक्षेप घेतला. आयसीसी आणि बीसीसीआयने ठेवलेल्या सर्व अटी धुडकावून लावत पाकिस्तानी सरकारकडून मंजूरी मिळवण्याच्या नावाखाली पाकिस्तानी बोर्डाने निकाल लटकवून ठेवला.
भारताने काय म्हटलं?
पाकिस्तानी सरकारनेही अनेकदा वाटेल ती विधानं करत अखेर संघाला भारतात पाठवण्यास होकार दिला. या संपूर्ण घटनाक्रमाला भारत सरकारने फारसं महत्त्व दिलं नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आता पाकिस्तानी संघाच्या या दौऱ्यासंदर्भात बोलताना, “पाकिस्तानी संघाला कोणतीही विशेष वागणूक मिळणार नाही. इतर संघांप्रमाणेच त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील,” असं सांगितलं. पाकिस्तानी संघाला भारतात पाठवताना संघाला अधिक चांगली सुरक्षा द्यावी अशी मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. “भारतामध्ये विश्वचषक खेळण्यासाठी येणाऱ्या सर्वच्या सर्व 10 संघांना उत्तम सुरक्षा मिळेल याची काळजी आम्ही घेऊ. केवळ पाकिस्तानी संघच नाही तर सर्वच संघांना आवश्यक ती सुरक्षा पुरवली जाईल,” असं भारत सरकारच्यावतीने बागची यांनी स्पष्ट केलं आहे.
कधी होणार सामना?
भारत आणि पाकिस्तानी संघादरम्यान होणारा सामना आधी 15 ऑक्टोबर रोजी होणार होता. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये बदल करत 14 ऑक्टोबर रोजी हा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतातील 5 वेगवेगळ्या शहरांमध्ये पाकिस्तानी संघ सामने खेळणार असून सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारवर असणार आहे.