भाडेकरूंची माहिती न घेणे पडले महागात; पिंपरी-चिंचवडमध्ये १६६ घरमालकांवर गुन्हा
पुणे: पुणे करांनो घर भाड्याने देणार असाल तर ही बातमी वाचाच. भाडेकरूंची माहिती वेळेत पोलिसांना न दिल्याने १६६ घरमालकांना भोवले आहे. पोलिसांनी वारंवार केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत या घरमालकांवर थेट गुन्हा दाखल केला आहेकाही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. ते पुण्यात कोंढवा येथे राहत होते. ते ज्या ठिकाणी राहत होते, त्या घरमालकाला त्यांची काही ही माहिती नव्हती. तसेच पुण्यातील वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डांगे चौक येथे चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हे चोरटे बाजूच्या खोलीत भाड्याने राहत होते. घरमालकाला त्यांची देखील कुठलीच माहिती नव्हती.
त्यामुळे शहरातील नोंद नसलेल्या भाडेकरू आणि घरमालकांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी भाडेकरूंची माहिती द्यावी, असे आवाहन शहरातील घरमालकांना पोलिसांनी केले आहे. त्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र असे असतांना देखील अनेकांनी भाडेकारूनची नोंद न केल्याने अखेर पोलिसांनी १६६ घर मालकांवर थेट गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांची पथके भाडेकरूंच्या नोंदी तपासण्यासाठी हद्दीत फिरत असून सांगवीसह अन्य काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत परदेशी नागरिक कोणतीही नोंद नसल्याचे आढळले. तसेच व्हिसाची मुदत संपूनही अवैधरीत्या काही परदेशी नागरिक देशात राहत असल्याचे समोर आले आहे. भाडेकरू नोंद करण्यासाठी पोलिसांच्या www.pcpc.gov.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून नोंदीची प्रक्रिया करता येते; तसेच इंटरनेटचा वापर शक्य नसलेल्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन फॉर्म भरून द्यावा. त्यासाठी भाडेकरू, घरमालकाचे फोटो, सरकारी ओळखपत्र गयावे असे आवाहन पिंपरीचिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.