युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत – PM शहबाज शरीफ
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही तणावाचे आहेत. भारताने वारंवार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरांवरही त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र जाहीरपणे भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. पण आता मात्र पाकिस्तानचा सूर काहीसा बदलताना दिसू लागला आहे. पाकिस्तानने आता भारताला चर्चेसाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं आहे.
इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ बोलत होते. “जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर असेल तर आपण (पाकिस्तान) चर्चेसाठी तयार आहोत,” असं शहबाज शरीफ यांनी सांगितलं आहे. “गेल्या 75 वर्षात भारत आणि पाकिस्तानने तीन युद्धं लढली आहेत. या युद्धांमुळे गरिबी, बेरोजगारी आणि साधनांची कमतरता निर्माण झाली. युद्ध हा काही आता पर्याय नाही,” असं शहबाज शरीफ म्हणाले आहेत.
शहबाज शरीफ यांनी 1965 (काश्मीर युद्ध), 1971 (बांगलादेश विभाजन), 1999 (कारगील युद्ध) यांचा उल्लेख केला आहे. या तिन्ही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.
अण्वस्त्रांचाही केला उल्लेख
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला. ते म्हणाले “पाकिस्तानकडे अण्वस्त्रं आहेत. पण ही अण्वस्त्रं आक्रमक होण्यासाठी नाही, तर आपली रक्षा करण्यासाठी आहेत. परमेश्वराने असं करु नये, पण जर उद्या अण्वस्त्र युद्धाची स्थिती निर्माण झाली तर काय झालं होतं हे सांगण्यासाठी एकजणही जिवंत नसेल. युद्ध हा पर्याय नाही”.
पाकिस्तान एकीकडे शांततेसाठी चर्चा करत असला, तरी दुसरीकडे आपल्या अण्वस्त्रांमध्ये वाढ करत आहे. गेल्या एक वर्षात पाकिस्तानने 5 अण्वस्त्रं आपल्या शस्त्रसाठ्यात जमा केली आहेत.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या जून 2023 च्या अहवालानुसार, चीनने गेल्या एका वर्षात 60 अण्वस्त्रे वाढवली आहेत. रशियाने 12, पाकिस्तानने 5, उत्तर कोरियाने 5 आणि भारताने 4 शस्त्रे वाढवली आहेत. अहवालानुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 164 आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळी चर्चेसाठी आवाहन करताना, दुसरीकडे भारतावर आरोपही केले. असामान्य गोष्टी दूर केल्याशिवाय स्थिती सामान्य होणार नाही हे भारताने समजणं गरजेचं आहे. काही गंभीर मुद्द्यांना शांततेच्या मार्गाने चर्चा करत सोडवलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
पाकिस्तान सध्या एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत असतानाच पंतप्रधानांनी हे विधान केलं आहे. गेल्या आठवड्यात खैबर पख्तूनख्वा येते एका रॅलीत आत्मघाती हल्ला केली. यामध्ये 54 लोक ठार झाले. 2023 मध्ये आतापर्यंत 18 आत्मघाती हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये 200 लोक ठार झाले आहेत. तसंच महागाईही वाढली आहे. दरम्यान, भारताने जोवर पाकिस्तान दहशतवादाला वाढ देणं बंद करत नाही तोवर चर्चा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे