नक्षल्यांनी उभारलेले स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त
गडचिरोली : नक्षलवादी बटलूच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केले. भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे ही कारवाई करण्यात आली.
नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षल सप्ताहनिमित्त विघातक कारवाया केल्या जातात. पोलिस दल तसेच सशस्त्र दलाच्या जवानांना नुकसान पोहोचविणे, मृत नक्षली यांचे स्मारके उभारणे, जनतेमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करणे अशा कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज असते. भामरागड तालुक्यातील ताडगाव हद्दीतील अतिदुर्गम विसामुंडी या गावाजवळ नक्षलवादी संजू ऊर्फ बिटलू तिरसू मडावी याचे स्मारक उभारले होते. पोलिसांच्या विशेष अभियान पथक व शीघ्रकृती दलाच्या जवानांनी हे स्मारक उद्ध्वस्त केले. त्याचे स्मारक उद्ध्वस्त करून स्थानिकांना विश्वास दिला असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
साईनाथच्या हत्येत होता बिटलूचा सहभाग
संजू ऊर्फ बिटलू मडावी हा नक्षल चळवळीतील महत्त्वाचा चेहरा मानला जातो. त्याच्यावर ७ खून,२ चकमक व ४ जाळपोळ व दरोड्याचे २ असे एकूण १५ गुन्हे नोंद होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा निष्पाप आदिवासी विद्यार्थी साईनाथ नरोटे याच्या हत्येमध्ये बिटलू याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तो शस्त्राच्या धाकावर नेहमीच आदिवासींना दहशतीत ठेवायचा. ३० एप्रिल रोजी पोलिस चकमकीत बिटलूचा खात्मा झाला. जवानांनी तुडूंब वाहणाऱ्या नाल्यातून वाट काढत त्याचे स्मारक उद्ध्वस्त करून नक्षल्यांचे कारनामे उढळून लावले.