हरियाणात हिंसाचार उफाळला; २ ठार;अनेक जण जखमी; शाळा-इंटरनेट बंद
हरियाणामध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊन मोठा हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात २ ठार तर २० पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हरियाणा सरकारने नूह आणि गुढगाव मध्ये CrpC च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
तसेच सोमवारी रात्री उशिरा गुढगाव, फरीदाबाद आणि पलवलमधील सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मृतांमध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. हिंसाचारत झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. तसेच केंद्राकडून मदत पाठवण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या वतीने आयोजित धार्मिक मिरवणूक – ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा आणि भाजप जिल्हाध्यक्षा गार्गी कक्कर यांनी गुरगावच्या सिव्हिल लाईन्स येथून झेंडा दाखविल्यानंतर नुह चौकात जातीय तणाव निर्माण झाला. हिंसाचार उफाळल्यानंतर हरियाणाच्या गुरुग्रामजवळील एका मंदिरात सुमारे २५०० पुरुष, महिला आणि मुलांनी आश्रय घेतला आहे.
Haryana Violence : नेमके काय घडले?
हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या एका मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर भडकलेल्या दंगलीत अनेक जण जखमी झाले, तर कित्येक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. गावात तणाव असून, पोलिसांनी ध्वजसंचलन करून शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, नूहमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या युवा शक्ती बजरंग दलाच्या वतीने नलहद महादेव मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक एका भागातून जात असताना या मिरवणुकीवर जोरदार दगडफेक करण्यात आली व जमावाने मिरवणुकीतील दोन वाहने पेटवून दिली. यामुळे एकच गोंधळ माजला व दोन्ही बाजूंकडून दगडफेक सुरू झाली.
हे जमाव नूह शहराच्या विविध भागांत जात जाळपोळ करीत होते. जमावाने अनेक खासगी व सरकारी वाहने पेटवून दिली व तोडफोड केली. अनेक दुकानांवर तुफान दगडफेक करण्यात आली. मिरवणुकीमुळे तैनात करण्यात आलेला बंदोबस्त अपुरा पडल्याने पोलिसांना जमावाला काबूत आणण्यास वेळ लागला. तातडीने लगतच्या शहरांतून एक हजार पोलिसांची कुमक मागवण्यात आली. ती येईपर्यंत नूहमध्ये हिंसाचार चांगलाच भडकला होता. जमाव दगडफेक करीत धुमाकूळ घालत होता. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी काही भागांत हवेत गोळीबारही केला. अनेक ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
तिरंगा पार्क, गली बाजार, होडल बायपास, नया बाजार भागातील दुकाने पटापट बंद करण्यात आली. पलवल, फरिदाबाद आणि रेवाडी येथून अतिरिक्त पोलिस बल मागवण्यात आल्यानंतर नूहमध्ये हिंसाचार आटोक्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शहरातून ध्वजसंचलनही केले.
Haryana Violence : इंटरनेट बंद
हिंसाचारानंतर इतरत्र तणाव पसरू नये, यासाठी पोलिसांनी नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच संवेदनशील भागांत पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गरज भासल्यास राखीव पोलिस दलाच्या तुकड्या रवाना करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
Haryana Violence : आरोप-प्रत्यारोप
हिंसाचाराच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. ‘विहिंप’ने म्हटले आहे की, मिरवणूक शांततेने सुरू असताना खोडसाळपणे दगडफेक करून वातावरण भडकावण्याचाच प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणातील दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ‘विहिंप’ने केली आहे. दुसरीकडे, मुस्लिम समाजाने आरोप केला आहे की, राजस्थानच्या लिंचिंग प्रकरणातील आरोपी मोनू मनेसर या मिरवणुकीत सहभागी झाला होता व तो आपल्या साथीदारांना चिथावणी देत होता, त्यातूनच हा हिंसाचार भडकला.