गुटखा पकडायला गेलेल्या पोलीस कर्मचार्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
बीड : पेट्रोल पंपावर संशयास्पद उभा केलेल्या टेम्पोबाबत चालकाकडे विचारणा करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचार्याच्या अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर टेम्पोचालकाने तेथून टेम्पोसह पळ काढला.
बीड तालुक्यातील पाली येथे घडला. यानंतर पोलीस कर्मचार्याने वरिष्ठांना माहिती देताच पाडळशिंगी टोलनाक्याजवळ हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला. त्यातून तब्बल ३१ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
माजलगाव उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गणेश नवले यांना गोपनिय बातमीदाराकडून गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी डीवायएसपी पंकज कुमावत यांना याबाबत कल्पना दिली. त्यांच्या सुचनेवरुन ते बीड ते मांजरसुंबा दरम्यान असलेल्या एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या गाडीची तपासणी करण्याबाबत चालकाकडे विचारणा करताना त्याने टेम्पो सुरु करुन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या दुचाकीवरही टेम्पो घालून नुकसान केले.
यानंतर नवले यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवताच सदर टेम्पो गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी टोलनाका येथे पोलिसांनी पकडला. या प्रकरणी चालक सोमनाथ जालिंदर मळेकर, भिमराव साळुंके (टेम्पोमालक, रा. निगडी, पुणे) व गुटख्याचा मालक महारुद्र मुळे (रा. घोडका, राजुरी) यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.