साईबाबा संस्थानच्या मराठमोळ्या जेवणाचा स्वाद राष्ट्रपतीना आवडला ! दोन्ही आचारी आता जाणार थेट दिल्लीत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना श्री साईबाबांच्या प्रसादालयातील मराठमोळ्या जेवणाचा स्वाद आवडल्याने साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील दोन आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आले आहे दि. ७ जुलै रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शिर्डी दौरा नुकताच झाला. त्यांनी साई समाधीचे दर्शन घेऊन आशिया खंडातील सर्वात मोठे मेगा किचन असलेल्या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भोजनाचा आस्वाद घेतला होता. यावेळी त्यांच्यासाठी खास मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यामध्ये महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती असलेल्या पदार्थांमध्ये साधी दाळ, चपाती, बटाटावडा, मेथीची भाजी, शेंगदाणे चटणी, मटकीची हुसळ, शिरा, सलाड आदींचा समावेश होता. महामहीम राष्ट्रपती व त्यांच्याबरोबर असलेल्या इतर मान्यवरांचे जेवण बनवण्याची जबाबदारी प्रसादालय विभागाचे स्वयंपाकी अर्थात आचारी रवींद्र वहाडणे तसेच प्रल्हाद कर्डिले यांच्यावर सोपवण्यात आली होती.
या दोन्ही कर्मचाऱ्यांनी भोजनात अत्यंत चविष्ट पदार्थ बनविले होते. राष्ट्रपतींना भोजनातील महाराष्ट्रीयन मेनू अर्थात पदार्थ आवडले. त्यानंतर राष्ट्रपती भवन येथून श्री साईबाबा संस्थानला पत्र पाठवून काही दिवस वहाडणे व कर्डिले यांना राष्ट्रपती भवनात येण्याचे कळविण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी संस्थानच्या या आचाऱ्यांना दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचे समजते. शिर्डीकरांसाठी ही अभिमानाची बाब असून वहाडणे व कर्डिले या दोघांना राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रित करण्यात आल्याने साईबाबा संस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे.
वहाडणे हे शिर्डीजवळ न.पा. वाडी येथील तर कर्डीले हे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी आहेत. दोघेही साईप्रसादालय विभागाच्या किचन मॅनेजमेंटचे काम बघतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीच्या हाताने बनवलेल्या जेवणाची राष्ट्रपतींनी दखल घेतली, ही कौतुकास्पद बाब आहे.