घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या
नागपूर : घरगुती वादातून सख्या भावाकडून गतिमंद बहिणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.खुशी किरण चौधरी (३८, पडोळे नगर) असे मृतक बहिणीचे नाव असून सूरज लक्ष्मणराव रक्षक (४५) हा आरोपी आहे. दोघेही सख्खे भाऊबहीण होते. खुशीचे काही वर्षांअगोदर लग्न झाले होते, मात्र ती काहीशी गतिमंद असल्याने पतीने तिला सोडले होते. तेव्हापासून ती भावाजवळच राहत होती. सूरज हा मजुरीची कामे करायचा. काही दिवसांअगोदर गोंदियात खुशी ही रेल्वेगाडीतून खाली पडली व त्यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तिच्या पायांना प्लॅस्टर होते. त्यामुळे तिची पूर्ण सेवा सूरजलाच करावी लागत होती. तिला वेदना व्हायच्या व ती कळवळायची. अगोदरच ती गतिमंद व त्यातून तिची सर्व कामे करावी लागत असल्याने सूरज कंटाळला होता.
लहानशा गोष्टीवरून बुधवारी रात्री त्यांच्यात वाद झाला व रागात सूरजने तिच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. यात तिच्या तोंडावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्याचवेळी सूरजचा सावत्र पुतण्या पियुष रक्षक (२६, वाठोडा) तेथे आला व सूरज त्याचवेळी खुशीला मारहाण करत होता. पुतण्याने विचारणा केल्यावर सूरज तेथून निघून गेला. मात्र खुशी बेशुद्ध झाली. पुतण्याने पोलिसांना माहिती दिली. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंदनवन पोलीस ठाण्यात पियुषच्या तक्रारीवरून सूरजविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.