काकाने पुतणीशी लग्न केलं, विचित्र विवाहाची सर्वत्र चर्चा
प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हैं वो प्यार करते नहीं! हे हिंदी गाणं खूप प्रसिद्ध झालं. प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं जातं. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जात-धर्म, वर्ण-पंथ, श्रीमंती-गरीबी, वयातला फरक असं काहीही दिसत नसतं.
एकदा प्रेम झालं की ती व्यक्ती त्यात आकंठ बुडते. मग ती व्यक्ती प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होते. मात्र आजकाल प्रेमाच्या नावाखाली नात्यांचं पावित्र्यही डागाळलं जाऊ लागलं आहे. नात्यामधील पावित्र्य कलंकित करणारे एक प्रकरण उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये घडले आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याची पुतणी आवडायला लागली. त्याने आपले प्रेम पुतणीसमोर व्यक्त केलं असता ती देखील याला तयार झाली. या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. दोघांच्या हट्टापायी दोघांची कुटुंबेही तयार झाली आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले.
जौनपूरमधल्या मरियाहू गावातल्या एका व्यक्तीला त्याची पुतणी आवडायला लागली. त्याने आपले प्रेम पुतणीसमोर व्यक्त केलं. पुतणीलाही आपला काका आवडायला लागला. दोघांमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघे एकाच घरातील असल्याने कुटुंबे हा त्यांच्या प्रेमात अडसर बनला होता. मात्र दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं अशी शपथच घेतली होती, ज्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्या घरच्यांनी काका पुतणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही ऐकले नाहीत. अखेर या दोघांचं त्यांच्या घरच्यांनी कोतवाली आवारात असलेल्या हनुमान मंदिरात लग्न लावून दिलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या लग्नाबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. लग्नानंतर दोघांची संमती स्टॅम्प पेपरवरही नोंदवण्यात आली आहे. कोतवाली परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात स्वत:च्या पुतणीशी लग्न केल्यानंतर शुभमने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून त्याचे पुतणी रिया हिच्यावर प्रेम आहे.