ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

“अमित हा महाराष्ट्रभर.”, टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया


पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं वाहन रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला.
ही घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनसे नेते अमित ठाकरे शिर्डीहून मुंबईला परत येत असताना सिन्नरमधील टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी हुज्जत घातल्याचं सांगण्यात येतंय. या वादानंतर त्याच दिवशी २३ जुलैला रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. या टोलफोडीनंतर भारतीय जनता पक्षाने मनसेवर टीका सुरू केली आहे. तर मनसेनेही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

या टोलफोडीच्या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांची आगामी निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टोलफोड प्रकरणावर भाष्य केलं. यावर ठाकरे म्हणाले, अमित सध्या महाराष्ट्रचा दौरा करतोय. तो काही सरसकट टोलनाके फोडत चालला आहे, असं काही नाही. सिन्नरमधील एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, त्या टोलनाक्यावर अमितची गाडी ही बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरी देखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्या कर्मचाऱ्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं गेलं. त्यानंतर ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित संपूर्ण महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही.

ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? ते जनतेला सांगावं. राज्यातील हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही भाजपने बोलावं असंही राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, दुसरीही लवकरच

अजित पवारांच्या शिंदे सरकारमधील एन्ट्रीवरून राज ठाकरेंनी परखड टीका केली आहे. राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे, दुसरीही लवकरच जाईल, असं राज ठाकरे पुन्हा म्हणाले. अजित पवारांना जेलमधून टाकू असं म्हणणाऱ्यांनीच त्यांच्यासोबत युती केली, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button