भिवंडीतील पडघ्याचा टोलनाका बंध झाला नाही तर. रईस शेख यांचा सरकारला इशारा
मुंबई:नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून खड्ड्यांबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मुद्दा सपाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत मांडला.मागील काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. दादा भुसे तातडीने रात्रीच्या वेळी दुर्घटनेस्थळी पोहोचले. आम्ही देखील पाहिलं. परंतु या घटनेला फक्त सरकार जबाबदार आहे. कारण त्याठिकाणी मेन्टेनन्स नावाची कोणतीही गोष्ट नाहीये. पडघ्याचा टोलनाका बंध झाला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारला दिला आहे.
पडघा या मार्गिकेपासून ते ठाणेपर्यंत एक्स्प्रेस वेची गरज आहे. पडघा टोलनाक्याचं काहीही महत्व नाहीये. त्याला कोणतंही मेन्टेनन्स देखील नाहीये. तिथे फक्त हफ्ता सुरू असतो. त्या टोलनाक्याला बंद केलं जात नाहीये. पडघ्याचा टोलनाका कधी बंद होणार? जर हा टोलनाका बंद झाला नाही तर समाजवादी पार्टी त्याठिकाणी धरणं आणि आंदोलन करेल. त्याठिकाणी फक्त लोकांची लुटमार केली जात आहे. भिवंडी-कल्याण-पडघावरील लोकांवर दादा भुसे यांनी लक्ष द्यावे, असं रईस शेख विधानसभेत म्हणाले.
दोन रस्त्यांच्या संदर्भात रईस शेख यांनी मुद्दे उपस्थित केले. त्यावर शिंदे गटाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं. पहिला रस्ता वडपे ते ठाणे आणि दुसरा म्हणजे वडपे ते नाशिक पासूनचा पुढचा रस्ता आहे. सध्या हा चार पदरी रस्ता असून 21 किमी लांबीचा हा रस्ता आहे. भिंवडी या रस्त्याच्या लगत मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांनी वडपे ते ठाणे या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य महाविकास महामंडळाला 16 जून 2021 मध्ये तो रस्ता हस्तांतरित करण्यात आला. उद्योजक म्हणून हा रस्ता त्याठिकाणी प्रदान करण्यात आला आहे. महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली या चार पदरी रस्त्याचं काम आठ पदरी करण्याच्या मार्गावर आहे. 2024 पर्यंत हे आठ पदरी काम पूर्ण केलं जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. सध्याच्या घडीला या रस्त्याचं तीस टक्के काम पूर्ण करण्यात आलं आहे. तरिही यावर आपण अजून काय उपाययोजना करू शकतो, यासाठी अधिकाऱ्यांना भेट दिली, असं मंत्री दादा भुसे म्हणाले.