22 वर्षांच्या विद्यार्थ्याने पकडला सर्वात मोठा अजगर
न्यूयॉर्क : अमेरिकेत फ्लोरिडामध्ये जॅक वॅलेरी नावाच्या 22 वर्षांच्या विद्यार्थ्याने सर्वात मोठा अजगर पकडला. या अजगराची लांबी 19 फूट असून वजन 56.6 किलो आहे. हा जगातील सर्वात मोठा ‘बर्मीज पायथॉन’ असल्याचे म्हटले जाते.
एखाद्या प्रौढ जिराफाइतकी या अजगराची लांबी आहे. हा अजगर पकडल्यानंतर त्याला नैऋत्य फ्लोरिडाच्या एका अभयारण्यात नेण्यात आले. तिथे त्याचे वजन आणि लांबी मोजण्यात आली. ऑक्टोबर 2020 मध्ये फ्लोरिडामध्येच एक बर्मी अजगर पकडण्यात आला होता. त्याची लांबी 18 फूट 9 इंच होती. तो आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा बर्मी अजगर ठरला होता. आता त्याच्यापेक्षाही मोठ्या आकाराचा हा अजगर पकडण्यात आला आहे. बर्मी अजगर हे जगातील सर्वात लांब अजगरांपैकी एक आहेत. ते अनोख्या पद्धतीने शिकार करतात. आधी आपल्या जबड्यातील दातांनी ते शिकार पकडतात आणि त्यानंतर शरीराचे वेटोळे घालून त्याला ठार मारतात.