पैशांची उधळपट्टी केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला !
पुणे: एक सराइत गुन्हेगार पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वारजे परिसरातील पाच घरफोड्यांचा छडा लागला आहे. रोहित वसंत पासलकर (वय 32,रा.रायकरमळा, धायरी) असे सराइताचे नाव आहे. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने, मोबाईल असा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पासलकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडी,चोरी, जबरी चोरी,दुखापत अशा तब्बल 20 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी राजेंद्र मारणे व संजीव कळंबे हे गस्त घालत असताना, नुकताच तडीपारीतून मुक्त झालेला सराइत गुन्हेगार पासलकर चोरीच्या पैशांची उधळपट्टी करत आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने चैतन्य चौक, वारजे येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार संतोष क्षीरसागर, कर्मचारी शरद वाकसे, किरण पवार, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.