पावसाचा जोर वाढणार! १९ ते २२ जुलैदरम्यान ‘कोसळधार’.
नागपूर : महाराष्ट्रातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने वेग पकडला आहे, पण अजूनही पेरणीयोग्य म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, आता मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मोसमी वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. तर याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. राज्यात गेले आठवडाभर फारसा पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून कोकण विभागात पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने दिलासा दिला. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर किंचित वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारपर्यंत कोकण विभागात सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रात रविवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातही रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर बहुतांश सर्व ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.