मुलांच्या लसीकरणाचेही आता मिळेल ‘रिमाइंडर’; येत्या ऑगस्टपासून सुरू होणार ‘ॲप’
छत्रपती संभाजीनगर : जन्मानंतर मुलांचे नियमितपणे लसीकरण करावे लागते. त्यासाठी लसीकरणाचे कार्ड सांभाळून ठेवावे लागते. पुढील लसीची तारीखही लक्षात ठेवावी लागते. मात्र, ऑगस्टपासून लसीकरणाचे ‘रिमाइंडर’ मोबाइलवर मिळणार आहे.
हे शक्य होणार आहे ‘यू-विन’ या ॲपमुळे.
कोरोना प्रादुर्भावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन पोर्टल आणि ॲप आले. त्याच धर्तीवर आता लहान मुलांच्या लसीकरणासाठी ‘यू-विन’ हे ॲप ऑगस्टमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून लहान मुलांना जन्मापासून देण्यात येणाऱ्या सर्व लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी पहिल्यांदा नोंदणी होईल. पुढील लसीकरणाची तारीख या ॲपच्या माध्यमातून मिळू शकेल. लस घेतल्यानंतर प्रमाणपत्रही मिळेल.
ऑगस्ट महिन्यात यू-विन ॲप लाँच होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून बालकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येईल, लसीकरणाचे प्रमाणपत्रही त्याद्वारे मिळेल. पुढील लसीकरणाची तारीखही कळण्यास मदत होईल.- डाॅ. भूषणकुमार रामटेके, आरोग्य उपसंचालक
चिमुकल्यांना कोणत्या दिल्या जातात लसी?
बीसीजी, पोलिओ, हिपॅटायटीस बी., आयपीव्ही, पेंटावेलेंट, पीसीव्ही, रोटा, गोवर, मेंदूज्वर, डीपीटी इ. लसी ठरावीक कालावधीनंतर द्याव्या लागतात. आतापर्यंत त्यासाठी लसीकरणाचे कार्ड पालकांना सांभाळावे लागते. यापुढे त्यासाठी ‘यू-विन’ ॲपची मदत होईल.