‘एक सही संतापाची’ काय आहे हा उपक्रम, कोणी उघडली मोहीम
पुणे : राज्यातील राजकारणात २०१९ पासून अनेक बदल होत आहे. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती एकत्र लढल्या. भाजप अन् शिवसेना युतीला बहुमतही मिळाले. परंतु सरकार आले महाविकास आघाडीचे.
शिवसेनेने भाजपला सोडून काँग्रेस अन् राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर वर्षाभरापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला. ४० आमदारांसह बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना मिळाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडला. त्यांनीही आपणास ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राज्यात आता शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असे सरकार सत्तेवर आले आहे.
कोणी सुरु केला उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला आहे. पुणे शहरात मनसेची सह्यांची मोहीम सुरु केली आहे. मतदारांच्या मताला विचारात घेतलं जात नाही, एका चिन्हावर निवडून येतात आणि दुसरीकडे जाताय, आम्ही आमचा संताप सहीतून व्यक्त करतोय, असा हा उपक्रम आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे शहरात या उपक्रमास सुरुवात केली आहे.
पंढरपूरमध्ये सुरु झाला उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ या मोहीमेला प्रारंभ सोलापूर जिल्ह्यात झाला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून या मोहिमेला सुरुवात झाली. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे का? माझ्या मताला काही किंमत नाही का? एकदा मतदान केलं की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का? यासह विविध प्रश्न विचारत सहीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.
राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सर्वसामान्यांना संताप व्यक्त करुन देण्यासाठी मनसेने हा उपक्रम सुरु केला आहे.
सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून सर्व राजकारण सुरू आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने ही मोहीम सुरु केली गेली आहे.