विदेशी कैद्यांवर नियंत्रण ठेवणार – विशेष पोलिस महानिरीक्षक
अमरावती : राज्याच्या कारागृहात विदेशी कैद्यांना ई- प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंग करता यावे, यासाठी या संपूर्ण यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी पुणे येथील कारागृह मुख्यालयातील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे विशेषत्वाने जबाबदारी सोपविण्यात आली आहे
आजमितीला ६३७ विदेशी बंदीसंख्या असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंद्यांना कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याकरिता ई-प्रिझम प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ही सुविधा अद्यापही विदेशी बंद्यांना देण्यात येत नव्हती. विदेशी बंद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून ई-प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंग सुविधा पुरवून मानवी हक्कांचे सरंक्षण करणे गरजेचे आहे, असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढून कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी ४ जुलै २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून ही सुविधा लागू केली. तथापि, पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना ही सुविधा राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना निर्देश दिले आहेत.
मध्यवर्ती कारागृहांमध्ये ६३७ विदेशी कैदी
राज्यातील विविध कारागृहांत आजमितीला ६३७ बंदी दाखल आहेत. विशेषतः मुंबई, नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात विशेषतः नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ आदी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल झाले आहेत.
कारागृहातून गर्दी कमी होण्यास मदत होईल
ही सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल. कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंद्यांची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ही सुविधा परिणामकारकपणे यशस्वितेची जबाबदारी पुणे येथील कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.