अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत
नागपूर : बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी नागपूरहून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी भूस्खलन आणि थंडीच्या लाटेसोबत अतिवृष्टीमुळे बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊ शकले नाही. चढाईला सुरूवात करताच अचानक हवामान खराब झाले. पहाडावरून दगड पडू लागले आणि त्यामुळे महिला भाविक घाबरल्या. डोळ्यात पाणी दाटले असतानाच देवदुतांच्या रुपात सेनेचे जवान मदतीला आले. त्यांनी भाविकांचे प्रोत्साहन वाढवून त्यांना सुरक्षितपणे कॅम्पवर पोहचवले. आता हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
६१ भाविकांच्या या जत्थ्यात ३० महिला भाविक आहेत. या जत्थ्यातील अर्धे भाविक पहाटे साडेचार वाजता बाबाच्या दर्शनाला पहाडी चढू लागले. उर्वरित भाविक सकाळी साडेसात वाजता निघाले. बहुतांश भाविक पायीच निघाले होते तर काही घोड्यांवर होते. पाऊस सकाळपासूनच पडत होता. दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर असा होता की रस्ताच दिसत नव्हता. अशात दगड पडू लागले. त्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. काय करावे ते सूचत नव्हते. जत्थ्यातील नीलेश त्रिवेदी आणि अभिलाष तिवारी यांनी सांगितले की, वादळाची पर्वा न करता सेनेच्या जवानांनी मोर्चा सांभाळला. स्वत: पुढे येऊन वरून पडणाऱ्या दगडांना झेलत नेट लावून मार्ग सुरक्षित केला. पुरूष आणि महिलांच्या वेगळ्या रांगा केल्या. बॅरिकेडस लावून समोरचा रस्ता बंद केला आणि प्रत्येकाला वस्तूस्थिती समजावून सांगत तयार केले. काही भाविक पाऊस थांबेपर्यंत प्रतिक्षा करण्याच्या विचारात होते. त्यामुळे जवानांनी भाविकांना हवामानाची माहिती देताना समजवले की भोलेनाथ तुम्ही भाविक येथपर्यंत आल्याने प्रसन्न झाले आहे. सर्वांचा घर-परिवार आहे. घरची मंडळी तुमची प्रतिक्षा करत आहेत, अशी समजूत घालून या भाविकांना जवानांनी खाली बेस कॅम्प पर्यंत सुरक्षितपणे पोहचवले.
सेनेच्या जवानांची दिलेरी
यात्रेच्या दरम्यान सेनेचे जवान क्षणाक्षणाला भाविकांच्या मदतीला तत्पर होते. पावसामुळे मार्गावर चिखल निर्माण झाला होता. सेनेचे जवान आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी हा मार्ग स्वच्छ करून भाविकांचा मार्ग सुकर केला. सेना जवानांच्या या दिलेरीचे भाविक मुक्तकंठाने गुणगाण करीत आहेत.
धार्मिक सद्भावनेचे प्रतिक
पवित्र गुहेपासून काही किलोमिटर अंतरापर्यंत पोहचलेले टेकडी रोड सीताबर्डी निवासी हितेश त्रिवेदी यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान घोडेवाले धार्मिक सद्भावनेचे प्रतिक बनले. हे सर्व घोडेवाले मुस्लिम आहेत. मात्र, मुसळधार पाऊस येताच त्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावली. थंडीने कापणाऱ्या महिलांच्या पायाची मालिश करून दिली तर काहींनी आपले जॅकेट काढून महिला भाविकांना दिले. जम्मू काश्मिर पोलीससुद्धा सेना जवानांसोबत मदत कार्यात अग्रेसर होते.