”दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचं” ठाकरे थेटच बोलले
मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी आणि संजय राऊत-अभिजीत पानसे यांचा एकत्रित प्रवास; यामुळे दोघे भाऊ एकत्र येण्याविषयी बोललं जात आहे.
या चर्चांवर बोलतांना राज ठाकरेंनी ती शक्यता फेटाळून लावली होती. त्यातच काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समोर आलेलं नसलं तरी दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, हे मात्र नक्की. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी आहे.
अमित ठाकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, सध्याच्या राजकीय चिखलात आम्ही नाहीत याचा मला अभिमान आहे. सध्या फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत लोकांच्या मनात काय आहे, हे कुणीही विचारत नाही. त्यामुळेच ‘एक सही संतापाची’ पद्धतीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही या राजकीय चिखलात नाही याचा अभिमान आहे. एका आमदाराचे आम्ही शंभर करू परंतु राजकारणाचा चिखल करणार नाहीत. दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही,असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
ते पुढे म्हणाले सध्या पक्षाचे दौरे सुरू होत आहेत. याशिवाय मुंबईत ही मेळावा होणार असून सध्या तरी आम्ही शांततेत पक्ष बांधत आहोत. मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं.