एक लाख कांदा गोण्यांची आवक
नगर: संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये या हंगामात मागील आठवड्यापासून विक्रमी आवक होत आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर मे महिना व जून महिना या दोन महिन्यात आवक जेमतेम होत होती. बुधवारी (दि.5) एक लाख सात हजार तीनशे एकोणसाठ इतकी विक्रमी गोण्यांची आवक व सात कोटी रुपयांची उलाढाल आज झाली.
मागील काही महिन्यात दर कमी असल्याने शेतकर्यांनी कांदा स्टॉक केला होता व कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने यंदा कांदा कमी प्रमाणात शिल्लक आहे. कांदा दरवाढ झाल्याने शेतकर्यांनी चाळीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढला असून, तो घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची प्रचंड प्रमाणात आवक होत असून परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
बुधवारी तब्बल 590 ट्रक इतका विक्रमी कांदा घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आला होता. यामधील नंबर एक कांद्यास 1450 ते 1750 रूपयांपर्यंत भाव मिळाला. सर्वात भारी कांद्यास 1800 ते 1900 रुपयांपर्यंत देखील दर मिळाला आहे. विक्रमी आवक होत असतानाही चांगला दर मिळत असल्याने शेतकरी खुश आहेत. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने परराज्यात पाठविण्यात येणार्या गाड्यांची लोडिंग रात्री उशिरापर्यंत सुरू असून दुसर्या दिवशी देखील लोडिंग होत आहे. विक्रीसाठी कांदा घेऊन येणार्या गाड्यांच्या मंगळवारी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मार्केट कमिटी प्रशासनाने नियोजन करून सर्व कांदा उतरवून घेण्याची व्यवस्था केली होती.
कांद्याला मिळालेलेबाजारभाव
मोठा कलर पत्तिवाला – 1450 ते 1750
मुक्कल भारी – 1250 ते 1350
गोल्टा – 900 ते 1000
गोल्टी – 700 ते 800
जोड – 250 ते 400
हलका डॅमेज कांदा – 300 ते 500
एक दोन लॉट – 1800 ते 1900