ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा पंढरीहून परतीचा प्रवास सुरू


बावडा: आषाढी एकादशी अर्थात पंढरपूरची वारी करून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने देहूकडे परतीच्या प्रवासासाठी सोमवारी (दि. 3) प्रस्थान ठेवले आहे  बुधवारी (दि. 5) दुपारी सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये निरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याने सराटी (ता. इंदापूर) येथे प्रवेश केला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. गुरुवारी (दि. 14) पालखी सोहळा देहू येथे पोहचणार आहे.

पंढरपूरहून गोपालकाला, पादुकांना स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट आणि नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा सोमवारी (दि. 3) परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्यानंतर सोहळ्याचा रात्रीचा मुक्काम वाखरी (ता. पंढरपूर) येथे झाला. तर मंगळवारी (दि. 4) पालखी सोहळ्याचा मुक्काम महाळुंग (ता. माळशिरस) येथे झाला. बुधवारी (दि. 5) दुपारी पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झाला. निरा नदी ओलांडून सोहळा सराटी (ता. इंदापूर) येथे दाखल झाला. या वेळी ग्रामस्थांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

या वेळी महेश जगदाळे यांनी अन्नदान केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, रवींद्र जगदाळे, मनोज जगदाळे, अमर जगदाळे यांनी स्वागत केले. त्यानंतर बावडा येथे शाहू चौकात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव घाडगे, अंकुश घाडगे, शंकर घाडगे, प्रदीप पारेख, सुयश लोखंडे, रमेश गायकवाड, बाळासाहेब कांबळे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोहळ्याने हिवरकरवस्ती येथे विसावा घेतला. या ठिकाणी शंकर ताम्हणे (अकलूज) यांनी अन्नदान केले. त्यानंतर पालखी सोहळ्याने वडापुरीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले.

पालखी सोहळ्यासोबत देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, पालखी सोहळाप्रमुख भानदास मोरे, धनंजय मोरे, दीपक मोरे, माणिक मोरे, राम मोरे आहेत. पालखी सोहळा लासुर्णे (दि. 6), बर्‍हाणपूर (दि. 7), हिंगणीवाडा (दि. 8), वरवंड (दि. 9), उरुळी कांचन, (दि. 10), नवी पेठ-पुणे (दि. 11), पिंपरी गाव (दि. 12) याप्रमाणे मुक्काम करून देहू येथे दि. 14 जुलै रोजी दाखल होईल.

परतीच्या पालखी सोहळ्यास वाढता प्रतिसाद!

पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असतात व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्‍यांची संख्या वाढली आहे. प्रवासादरम्यान नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संत देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button