जळगावात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; पोलिसांकडून शांततेचे आवाहन
जळगाव:शहरातील समतानगर भागात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला आहे. त्यामुळे अफवांना पेव फुटले आहे. यासंदर्भात कुणीही अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे आदींनी शांततेचे आवाहन केले आहे.
शहरातील समतानगर भागात महापुरुषाचा पुतळा आहे. शनिवारी सकाळी पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी पुतळ्याच्या ठिकाणी धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. समतानगर भागातील सर्वच धर्मीय समाजबांधव आक्रमक झाले आहेत. पुतळ्याच्या ठिकाणी समाजबांधवांनी ठिय्या दिला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परिसरात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
पुतळ्याची विटंबना करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी समाजातील आबालवृद्ध आक्रमक झाले असून, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे आदींनी समाजबांधवांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे नेते अनिल अडकमोल यांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमंशी संवाद साधत म्हणाले की, आजवर सर्वधर्मीय बांधव एकोप्याने राहत असलेल्या या समतानगराला डॉ. बाबासाहेब पुतळा विटंबनाने गालबोट लागले असून, यातील दोषींवर कारवाई करावी आणि याच्या मुख्य सूत्रधाराला तeत्काळ अटक करावी, अशी आमची मागणी आहे. अशी घटना या ठिकाणी पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे ३८ वर्षांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरजच भासली नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी एकोप्याने राहतात; परंतु कोणी समाजकंटकाने पुतळ्याची विटंबना केली आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे समतानगराला गालबोट लागले आहे, याचा आम्ही सर्व समतानगरवासी निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.