महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी
रत्नागिरी : संघटनेविरोधात भूमिका घेतल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक नेते प्रकाश काजवे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शुक्रवारी (२३ जून) पत्रकार परिषदेत जाहीर केले. काजवे यांच्याबरोबर समितीचे दापोली तालुकाध्यक्ष जावेद शेख, गुहागरचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष येलकर यांची हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेवेळी समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शिक्षक विजय पंडित, बळीराम मोरे, दिलीप महाडिक, अरविंद जाधव, अंकुश गोकणे, विलास जाधव, रुपेश जाधव, संतोष पावणे व अन्य शिक्षक नेते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूक पंचवार्षिक निवडणूक २३ जुलै रोजी होत आहे. या निवडणुकीत शिक्षक समितीबरोबर पदवीधर शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, अखिल शिक्षक संघ आणि शिक्षक सेना या संघटना महायुतीच्या माध्यमातून एकत्रित आल्या आहेत.
तसेच या निवडणुकीत पाच संघटना एकजुटीने १६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. त्यामध्ये शिक्षक समिती ११, पदवीधर शिक्षक संघटना दाेन, अखिल शिक्षक संघ एक, उर्दू शिक्षक संघटना एक आणि शिक्षक सेना एक असे जागा वाटप केले आहे.
काेरगावकर यांनी सांगितले की, शिक्षक समिती ही लोकशाही मार्गाने चालणारी संघटना आहे. काजवे हे विरोधी संघटनांबरोबर हातमिळवणी करून त्यांनी संघटनेच्या विरोधात काम केले. त्यांच्या मनाप्रमाणे संघटना चालणार नाही. त्यांची भूमिका संघटनेच्या विरोधात राहिल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे ते म्हणाले.
उर्दू शिक्षक संघटना फुटीच्या उंबरठ्यावर?
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत उर्दू शिक्षक संघटनेमध्ये महिला उमेदवारावरून वाद निर्माण झाला होता. काही पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारास विरोध करून पुरुष उमेदवार द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, उर्दू शिक्षक संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवार देण्याचे जाहीर केले. त्यामुळे ही संघटना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.