स्वतःचं सरण रचत वृद्ध दाम्पत्याने संपवलं आयुष्य; कारण वाचून सगळेच हळहळले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्याती वेतवडे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेतवडे गावातील एका वृद्ध दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्यानंतर अंत्यसंस्काराची आधीच तयारी करुन ठेवल्याचेही समोर आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर गावासह पंचक्रोशीत एकच चर्चा सुरु झाली आहे. आजारपणातील त्रास नकोसा झाल्याने या दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेतवडे येथील महादेव दादु पाटील (वय 74 ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील (वय 70) असे वृद्ध दाम्पत्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. या वृद्ध दाम्पत्याने आजारपणास कंटाळून मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान राहत्या घराच्या माळ्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वीच महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील यांनी स्वतःच्या चितेची पूर्ण तयारी करुन ठेवल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
वृद्धावस्थेतही करत होते काम
महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घरची परिस्थिती बेताची असणारे महादेव पाटील व त्यांची पत्नी द्वारकाबाई पाटील हे वेतवडे येथील एक गरीब व स्वाभिमानी वृध्द दाम्पत्य होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर पंचाहत्तरीतही महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील दिवसभर शेतात राबत होते. अख्ख्या गावात आण्णा आणि द्वारकाआई म्हणून हे वृध्द दाम्पत्य प्रसिद्ध होते.
आधल्या दिवशीच केली अंत्यसंस्काराची तयारी
पण या खडतर जीवनाची वाटचाल आता या दाम्पत्याला नको होती. त्यामुळे या वृध्द दाम्पत्याने जीवनातून कायमचीच एक्झिट घ्यायचे ठरवले. दोघांनीही मयत झाल्यानंतर शेतातील एका कोपऱ्यात आत्महत्येच्या आदल्या दिवशीच संध्याकाळी अंत्यसंस्काराची तयारी करुन ठेवली होती. अंत्यसंस्काराची जागा तयार करणे, अग्नी देण्यासाठी लाकडे गोळा करून ठेवणे, त्याच ठिकाणी पाण्याची घागर भरुन ठेवणे ,गवत गोळा करुन ठेवणे, मयताचे साहित्य इत्यादी तयारी महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील यांनी करुन ठेवली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने दोघांचीही आत्महत्या गावात चर्चेचा विषय ठरला होता. या गरीब वृध्द दाम्पत्याच्या अशा प्रकारच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.