अरे बापरे! याठिकाणी जन्मलं तब्बल ‘इतक्या’ किलो वजनाचं बाळ, वाचा सविस्तर…
अडीच ते तीन किलो वजनाचं बाळ जन्माला येत असल्याचं तुम्हाला माहिती असेल. मात्र, आंध्र प्रदेशामध्ये श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम येथे 5.2 किलो वजनाचं बाळ जन्माला येण्याची घटना घडली आहे.
या घटनेनं डॉक्टरांनासुद्धा आश्चर्यचकित केलंय. दरम्यान, आई आणि नवजात बाळ या दोघांची प्रकृती चांगली आहे. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यामध्ये धर्मावरम येथे अयुब आणि शबाना खानम हे दाम्पत्य राहते. संसाराचा गाडा हाकण्यासाठी हे दोघेही मजुरीचं काम करतात.
या दाम्पत्यानं नुकताच एका बाळाला जन्म दिला असून त्याचं वजन तब्बल 5.2 किलो आहे. म्हणून बाळाचं वजन जास्त – शबाना खानम या गरोदर होत्या. प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे त्या 30 मे 2023 रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, व पोटातील बाळाचं वजन जास्त असल्यानं शबाना यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्याचदिवशी (30 मे) शबाना यांची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेनं करण्यात आली, व त्यांनी 5.2 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. तर, गर्भामध्ये सामान्यपेक्षा जास्त अॅम्निऑटिक द्रव तयार झाल्यामुळे बाळाचं वजन वाढलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर म्हणाले… आंध्र प्रदेशातील दुर्मिळ अशा घटनेबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, ‘आई (शबाना खानम) या मधुमेहाच्या रुग्ण आहेत. गर्भामध्ये बाळ असताना जास्त प्रमाणात अॅम्निऑटिक द्रवपदार्थ तयार झाल्यामुळे त्यांच्या बाळाचं वजन वाढलं.
अशा प्रकारच्या दुर्मिळ प्रकरणांमध्ये, गर्भधारणेची पुष्टी झाल्याच्या दिवसापासून काळजी घ्यावी लागते. बाळ निरोगी जन्मावं, या साठी गर्भवती महिलेची नियमित तपासणी करावी लागते. विविध मेडिकल टेस्ट कराव्या लागतात. शबाना यांनी 5.2 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर संबंधित नवजात बाळाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवलं होतं. आता आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली असून या दोघांना नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय.’ दरम्यान, सामान्यत: नवजात बाळाचं वजन हे अडीच ते साडेतीन किलोच्या आसपास असतं.
मात्र, मधुमेह असलेल्या गर्भवतींमध्ये जास्त वजनाचं बाळ जन्माला येण्याची शक्यता असते. परंतु साधारपणे पाच किलोपेक्षा जास्त वजनाच बाळ जन्माला येण्याची घटना खूपच दुर्मिळ असते. अशीच घटना आंध्र प्रदेशमध्ये घडल्यामुळे तिची सध्या खूपच चर्चा सुरू आहे. आई व नवजात बाळ या दोघांची प्रकृती चांगली असल्यामुळे संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं कौतुकही होत आहे.