ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमेश्वरला रंगले सोपानकाकांचे पहिले अश्वरिंगण


सेवा ते आवडी उच्चारावें नाम

भेदाभेद काम निवारूनि ॥
नलगे हालावें चालावे बाहेरी
अवघेचि घरी बैसलिया ॥
देवाचींच नामें देवाचिये शिरीं।

सर्व अळंकारी समावीं ॥
तुका म्हणे होय भावेचि संतोषीं ।
वसे नामापाशी आपुलिया ॥

टाळ-मृदंगाच्या गजरात संत श्री सोपानदेव पालखी सोहळा रविवारी (दि.18) सोमेश्वर कारखान्यावर विसावला. सकाळी दहाच्या सुमारास सोहळा निंबुत येथून मार्गस्थ झाला. सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात वारकर्‍यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिले अश्व रिंगण झाले. निंबुत येथून सोहळा न्याहरीसाठी निंबुत छपरी येथे विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे, गौतम काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. वाघळवाडी येथे पालखी अंबामाता मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत गावकर्‍यांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून, निरा-बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. सरपंच अ‍ॅड. हेमंत गायकवाड, उपसरपंच गणेश जाधव, सतीश सकुंडे, विजय सावंत, अविनाश सावंत, अजिंक्य सावंत, बबलू सकुंडे, ग्रामविकास अधिकारी बापुराव चव्हाण उपस्थित होते.

दुपारी चार वाजता पालखी रिंगणासाठी मु.सा. काकडे महाविद्यालयात आली. पहिले अश्वरिंगण पाहण्यासाठी हजारो वारकर्‍यांनी गर्दी केली होती. अश्वाने रिंगण पूर्ण करताच भक्तिमय वातावरणात विठुनामाचा गजर करण्यात आला. प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर मानाच्या अश्वाने दोनवेळा रिंगण पूर्ण करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोल रिंगण पूर्ण होताच वीणेकरी तसेच तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी रिंगण पूर्ण केले. साईसेवा हॉस्पिटलच्या वतीने वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच अल्पोपाहार वाटण्यात आला. महसूल विभाग, सोमेश्वर कारखाना प्रशासन, आरोग्य विभाग, सोमेश्वर महावितरण यांनी सहकार्य केले. सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात विसावला.

सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, माजी सभापती प्रमोद काकडे, निता फरांदे, संचालक शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, प्राचार्य देवीदास वायदंडे, प्रा. जगन्नाथ साळवे, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, कालिदास निकम यांनी पालखीचे स्वागत केले. कारखान्याच्या वतीने वारकर्‍यांची राहण्याची व जेवणाची सोय केली होती. दर्शनासाठी सोमेश्वरसह मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजेपुल, करंजे, सोरटेवाडी, मगरवाडी, चौधरवाडी येथील भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.

शासनाकडून उत्तमप्रकारे सोय केली असून, पाणी, शौचालय, वैद्यकीय सेवा पुरविल्या आहेत. दररोज जिल्हाधिका-यांकडून आढावा घेतला जातो. यावर्षीच्या सोहळ्यात शंभर दिंड्या असून, वारकर्‍यांची संख्याही वाढली आहे. सुमारे दीड लाख वारकरी या सोहळ्यात आहेत.
– अ‍ॅड. त्रिभुवन महाराज गोसावी, प्रमुख, संत सोपानदेव पालखी सोहळा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button