राज्यात घाणेरडी सामाजिक परिस्थिती – राज ठाकरे
मीरा रोड : पूर्वी स्वतःच्या जातीबद्दल एक अभिमान असायचा. पण आता राजकारण्यांनी इतका गोंधळ घातला आहे की, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान सोडा उलट दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला आहे.
इतकी घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रात याअगोदर कधीच नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाईंदरच्या उत्तन येथील रक्तदान शिबिरावेळी केली.
राज ठाकरे यांच्या शाळेपासूनच्या बालमैत्रीण डॉ. रत्नप्रभा पिसाळ – पोसा व त्यांचे पती डॉ. सेवेरीन हे त्यांच्या पोसा रुग्णालयामार्फत गेली २५ वर्षे रक्तदान शिबिर होत आहे. केईएम रुग्णालय रक्तपेढी, सायन रुग्णालय रक्तपेढी, मीरारोडची भारतरत्न राजीव गांधी रक्तपेढी यांचे सहकार्य असते. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बिशप एडविन कोलासो, आमदार गीता जैन, मच्छिमार नेते लिओ कोलासो, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, फादर पीटर डीकुन्हा, आदी उपस्थित होते.
…तर रक्त काढून टाकाल का?
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जातीवरून उभी राहिली आहे. ज्यांना स्वतःच्या जातीबद्दल अहंकार आणि दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष अशा मनोवृत्तीची जी कोणी माणसे असतील त्यांनी रक्तदान शिबिर ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. ते जेव्हा रुग्णालयात जातात तेव्हा रुग्णालयात रक्तपेढीमधून येणाऱ्या रक्तावर ते कोणत्या जातीच्या व्यक्तीने दिले आहे ते लिहिलेले नसते. त्यामुळे ज्या जातीचा द्वेष करत आलात आणि कदाचित त्याच जातीच्या व्यक्तीचे रक्त तुमच्या अंगात चढवले असेल तर तुम्ही काय करणार आहात? ही जात आवडत नाही म्हणून समजल्यावर ते रक्त काढून टाकणार आहात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.