लेकीच्या जन्म भूमीतील वारकर्यांना कर्मभूमीत पुरण पोळीचा पाहुणचार
वर्धा:जगभर अनाथांची माई अशी ओळख असलेल्या आणि वर्धा जिल्ह्याची लेक असणार्या पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या जन्म भूमीतील वारकर्यांना कर्मभूमीत म्हणजे पुण्यात पुरण पोळीचा पाहुणचार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला वर्धा जिल्ह्यातील वारकर्यांची आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीतील वारकर्यांनी पुणे जिल्ह्यातील सासवडच्या आश्रमात दोन दिवस मुक्काम केला. दरम्यान माईंच्या संस्थेत विशेष आदरातिथ्थ्यानें वारकरी भारावून गेले असून 25 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वरांपासून जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. वर्धा जिल्ह्यातील जवळपास 200 वारकरी 25 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी होतात. यावर्षी देखील संत ज्ञानेश्वर माउली पायदळ वारकरी दिंडी मंडळ वर्धाचे व्यवस्थापक कवडू महाराज कठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. (Alandi to Pandharpur Dindi)
पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. त्यांनी पुणे येथे अनाथ मुला-मुलींचे आश्रम स्थापन केले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे वर्धा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचले. माई हयात असताना पासून त्या आपल्या जिल्ह्यातील वारकर्यांची दोन दिवस संपूर्ण व्यवस्था सासवड येथील ममता बाल सदनमध्ये करीत होत्या. त्यांच्या पश्चात देखील माईंचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड हे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात आहे. वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथून निघालेली श्री. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी बुधवारी 14 रोजी सायंकाळी सासवडच्या संस्थेत पोहोचली. पालखी सोबत आलेल्या वारकर्यांचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी 15 जूनला त्यांच्यासाठी खास वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार करून आदरातिथ्य केला. शुक्रवारी 16 जूनला सकाळी ही पालखी माऊलीचा जयघोष करीत जेजुरीमार्गे पंढरपूरसाठी रवाना झाली.