डांबरावरच्या शेतीत एमआयडीसीचे बुजगावणे
डोबवली: एमआयडीसी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात रस्त्याच्या भूसंपादनाचा वाद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एक मार्गिका बंद केली आहे.अडीच महिन्यांपासून ही मार्गिका बंद असूनही प्रशासन यात लक्ष घालत नसल्याने शेतकऱ्यांनी एमआयडीसी प्रशासनाला बुजगावण्याची उपमा देऊ केली आहे.
पिकांची नासाडी करणाऱ्या पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकरी शेतात बुजगावणे उभारतात. हे बुजगावणे काही काम करत नाही नुसतेच उभे असते. हेच क्रियापद एमआयडीसी प्रशासनाला देत शेतकऱ्यांनी डांबरावरील शेतीत एमआयडीसीच्या नावाचे बुजगावणे उभारले आहे.
बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावात एमआयडीसीने वाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन केले असून यामध्ये तफावत आढळून आले आहे. हक्काच्या जागेसाठी वसार गावातील स्थानिक शेतकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.
एमआयडीसी प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन ते अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्या जागेतील बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाकामार्गे जाणारी मार्गिका बंद केली.
मार्गिका बंद करून महिना उलटला तरी प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांची जमीन कसण्याचा निर्णय घेतला. डांबराच्या रस्त्यावर माती टाकत शेतकऱ्यांनी त्यावर भाजीची लागवड केली. रस्त्यावरील ही शेती रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होती.
तरीही एमआयडीसी प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलले नाही. अखेर शेतकऱ्यांनी डांबरी रस्त्यावर पिकवलेल्या शेतीत एमआयडीसी नावाचे बुजगावणे उभे केले.
वाहनचालक त्रस्त
बदलापूर मार्गावरील ३० मीटर अंतराची ही मार्गिका बंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. मार्गिका बंद केल्याच्या पहिल्या दिवशी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनसाठी रस्त्यावर रोड बॅरिकेड लावले होते; पण हे बॅरिकेड कधीचे उखडून गेले आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकही त्रस्त आहेत.
नरेश वायले, शेतकरी वसारवसार गावातील शेतकऱ्यांची शेती ही चक्क डांबरच्या रस्त्यावर आहे. आजूबाजूने जाणाऱ्या वाहनांमुळे या शेतीचे नुकसान होत आहे. या वाहनांना हाकलून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी बुजगावणे उभारले आहे. एमआयडीसी प्रशासन यात लक्ष घालत नाही. तसेच कोणतीही हालचाल करत नसल्याने आम्ही एमआयडीसी प्रशासनाला बुजगावण्याची उपमा देऊ केली आहे.