अयोध्या पौळ यांच्यावर का झाली शाईफेक? ‘हे’ आहे कारण!
ठाणे : उबाठा गटाच्या सोशल मिडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेकीची घटना उघडकीस आली आहे. कळवा येथे सुरू एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर शाईफेक व मारहाण करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री कळवा मनीषा नगर आणि जय भीम नगर भागात अहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत असताना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार शेवटी का घातला, असा जाब विचारत स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकत मारहाण केली, असा आरोप पोळ यांनी केला आहे.
आयोध्या पोळ यांना शिवसेना ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून ट्रॅप रचण्यात आला असल्याचा आरोप उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे ,शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेही या कार्यक्रमाला येणार असल्याचे पोळ यांना सांगितले होते. मात्र, यांच्यापैकी घटनास्थळी कुणीही उपस्थित नव्हते, अशी माहिती पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हल्ला करणाऱ्यांमध्ये झडप
अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करणाऱ्या महिलांवर ठाकरे गटाच्या महिलांनी हल्ला चढवला. दोघांमध्येही झडप पहायला मिळाली. पोलीस तक्रार करून घरी परतत असताना पोलीस स्थानकाच्या बाहेर आल्यावर हा प्रकार घडला. दरम्यान शाईफेक करणाऱ्या गटाला मारहाण करण्यासाठी आलेल्या महिलांना पोलीसांनी हुसकावून लावले. दरम्यान, महापुरुषांचा अवमान केल्या प्रकरणी पोळ यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.