ताज्या बातम्या

४५ गरोदर माता ‘एचआयव्ही’ बाधित, दोन वर्षांत आढळले ३४७ नवे रुग्ण


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये १ लाख ५ हजार ४९४ जणांची तर, २०२३-२४ मध्ये ४ हजार ३९० जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे ३२४ व २३ नवे एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहे.
विशेष म्हणजे, या दोन वर्षांच्या कालावधीत ५४ हजार ३०१ गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये ४५ गरोदर माता एचआयव्ही बाधित आढळून आल्या आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीचे जिल्हा एड्स नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, आरसीएच अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, नोडल अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. संपदा ठाकरे, जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. क्षमा बासरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुमंत पानगंटीवार उपस्थित होते.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही, गुप्तरोग, क्षयरोग व हिपॅटायटीस बी, सी समुपदेशन व चाचणी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी दिली. गतवर्षी २०२२-२३ मध्ये २०२११ व २०२३-२४ या सत्रात ४०९० गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये अनुक्रमे एकूण ४३ व २ गरोदर माता एचआयव्ही बाधित आढळून आल्या.

तसेच २०२२-२३ मध्ये १०५४९४ जणांची व २०२३-२४ मध्ये ४३९० जणांची एचआयव्ही तपासणी केली असता त्यामध्ये अनुक्रमे एकूण ३२४ व २३ एचआयव्ही बाधित आढळून आले आहे. या सर्वांना एआरटी उपचारांवर घेण्यात आले असून त्यांना प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच २२४६१ जणांनी जिल्हा स्तरावरील डी.एस.आर.सी. केंद्राला भेट देऊन गुप्तरोग संदर्भातील आजारांचे समुपदेशन व उपचार घेतले आहे.
एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेताना त्यांच्या निरकरणासाठी प्रशासकीय पाठबळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. यात प्रामुख्याने एआरटी केंद्राकरीता नवीन इमारत, रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी संगणक व बैठक व्यवस्था, मुबलक एआरटी औषधांचा पुरवठा, एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटातील देहविक्री करणाऱ्या स्त्रिया व हिजरा गटातील समुदायाला शोधून १०० टक्के एचआयव्ही तपासणी व त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्ह्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत ६ स्वयंसेवी संस्थां कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून अतिजोखिम गट, ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित कामगार, गरोदर माता, एचआयव्ही बाधित रुग्ण यांना विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात एचआयव्ही तपासणी सोबतच संशयीत रुग्णांची सिफिलीस,आरपीआर, क्षयरोग, हिपेटायटीस ‘बी’ व ‘सी’ ची तपासणी केली जात असून प्रत्येक गावात निरोध प्रमोशनवर भर देणे, तुरुंग प्रशासनासोबत समन्वय साधून बंदिवानांसाठी विशेष तपासणी व समुपदेशन कार्यक्रम घेणे, ग्रामीण भागात संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था (लिंक वर्कर प्रकल्प), विहान प्रकल्प व शहरी भागात संबोधन ट्रस्ट, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ संस्था कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button