सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग; शिक्षण मंत्र्यांची माहिती
शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी शिक्षण दिले जाणार आहे.
त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या मुलांप्रमाणेच आता मराठी आणि इतर माध्यमांच्या मुलांचाही शैक्षणिक पाया पक्का होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले.
‘व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषेचे शिक्षण घ्या’
आज जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे असेही त्यांनी म्हटले. परकीय भाषा अवगत केल्याने भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय, अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा, असे आवाहन दीपक केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी भारावले विद्यार्थी
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे मागील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ‘मिशन अॅडमिशन’ या उपक्रम अंतर्गत एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. तसेच यंदाच्या 2023-2024 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरीता व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ‘मिशन मेरीट’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री श्री. केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज्यभरातील शाळा आजपासून सुरू
आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला गेला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी अभ्यास न देता अगदी खेळीमेळीच्या वातावरण ठेवण्यात आलं. आजपासून राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी विदर्भातील शाळा आजपासून सुरु होणार नाहीत. विदर्भातील शाळा या येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरु होतात. मात्र, यावर्षी राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.