टँकरला भीषण आग; होरपळून चौघांचा मृत्यू
लोणावळा:पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात मिथेनॉल नावाचे ज्वालाग्रही रसायन (केमिकल) घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार्या टँकरला लोणावळ्यातील कुणेगाव पुलावर अपघात होऊन भीषण आग लागल्याने चारजणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन ते तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 11.35 च्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.
रितेश कोशिरे (वय 16) व कुशल वरे (9) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तथापि, त्यांचे नाव समजू शकले नाही. सविता वरे (35) या गंभीररीत्या होरपळल्या असून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकरमधील जखमींना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कुणेगाव पुलावर टँकर उलटला. लगेचच त्यास भीषण आग लागली. या टँकरमध्ये तीनजण असल्याची माहिती मिळाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. एकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पेटलेले रसायन अंगावर पडून दोघांचा मृत्यू
टँकर ज्या पुलावर उलटला, त्या पुलाखालून दुचाकीवरून जाणार्यांच्या अंगावर पेटलेले रसायन पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याशिवाय पुलाखाली आणखी दोन ते तीन गाड्या उभ्या होत्या. त्यादेखील भस्मसात झाल्या. त्यात सुदैवाने कोणीही नसल्याचे सांगण्यात आले.
क्रेनही आगीच्या धगीत
या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करीत असताना दुपारी 1.50 च्या सुमारास पुन्हा एकदा टँकरमधील रसायनाने पेट घेतला आणि या आगीच्या धगीत क्रेनही सापडली. सुदैवाने क्रेन ऑपरेटरने वेळीच बाहेर उडी मारून पळ काढल्याने तो बचावला. अपघातग्रस्त टँकरमध्ये मिथेनॉल हे पेट्रोलसद़ृश ज्वलनशील रसायन वेगवेगळ्या कप्प्यात भरले होते. ते टप्प्याटप्प्याने पेट घेत होते. त्याचे अधूनमधून छोटे-मोठे स्फोटदेखील होत होते. यामुळे बचाव यंत्रणांपुढे ही आग विझविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. अखेर 9 ते 10 अग्निशमन गाड्यांच्या सहाय्याने पाणी आणि आगविरोधी एएफएफएफ फोमच्या मदतीने टँकर व क्रेनला लागलेली आग विझविण्यात यंत्रणांना यश मिळाले. त्यानंतर मोठी क्रेन मागवून दोन्ही अपघातग्रस्त वाहने पुलावरून उचलून पुलाखाली ठेवली. नंतर दोन्ही लेनवरील वाहतूक सुरू करण्यात आली.
पाच तास वाहतूक ठप्प
अपघातामुळे एक्सप्रेस वेवर 5 तासांहून अधिक काळ वाहतूक एकाच जागी ठप्प होती. त्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांचे हाल झाले. त्यातच भरीस भर म्हणून यादरम्यान तीन ते चार वेळा पावसाने हजेरी लावली. पिण्याच्या पाण्याची, वॉशरूमची, खाण्या-पिण्याची काहीही सोय एक्सप्रेस वेवर नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.