विदेशात जाऊन देशावर टीका करणे शोभत नाही : गृहमंत्री
नवी दिल्ली: विदेशात स्वत:च्या देशावर टीका करणे एखाद्या नेत्याला शोभत नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला.गृहमंत्री शाह यांनी राहुल यांच्यावर विदेशात जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आणि त्यांना पूर्वजांकडून शिकण्याचा सल्ला दिला.
गृहमंत्री शाह राहुल यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्याचा संदर्भ देत होते. त्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली होती. (Amit Shah) शाह म्हणाले की, कोणत्याही देशभक्त व्यक्तीने भारतातील राजकारणावर चर्चा केली पाहिजे. परदेशात जाऊन भारताच्या राजकारणावर चर्चा करणे आणि देशावर टीका करणे हे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. राहुलबाबा लक्षात ठेवा, देशातील जनता लक्षपूर्वक पाहत आहे.
केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर भागात आयोजित सभेला गृहमंत्री संबोधित करत होते. मोदी सरकारच्या काळात देशाने मोठा बदल पाहिला आहे, असा दावा त्यांनी केला. (Amit Shah) शाह म्हणाले की, काँग्रेस पक्ष भारतविरोधी बोलणे थांबवत नाही. उन्हाळ्यामुळे राहुल बाबा विदेशात सुट्टीसाठी जात आहेत. विदेशात देशावर टीका करतात. मी राहुल गांधींना त्यांच्या पूर्वजांकडून शिकण्याचा सल्ला देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.