पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त; सात हजार पोलीस तैनात
पुणे :पालखी सोहळ्यांचे आगमन तसेच शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून सात हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे. सोमवारी (12 जून) पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (14 जून ) सकाळी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. पालख्यांच्या आगमनापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून नियोजन केले जाणार आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गुन्हेशाखेची खास पथके…
पालखी सोहळ्यातील गर्दीत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. साखळी चोरी, मोबाइल संच चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. गुन्हे शाखेतील दीडशे पोलीस कर्मचाऱ्याचा खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
पालखी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले
महिला पोलिसही सतर्क
पालखी सोहळ्यात महिला वारकरी तसेच महिला भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता बंदोबस्तामध्ये महिला पोलिसही विशेष तुकड्यांमध्ये संपूर्ण शहरात सतर्क राहणार आहेत.
दृष्टिक्षेपात बंदोबस्त…
पोलीस उपायुक्त- 10
सहायक पोलीस आयुक्त- 2
पोलीस निरीक्षक- 97
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक- 328
पोलीस कर्मचारी- 3 हजार 545
राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या
गृहरक्षक दलाचे जवान