शेतकरी महिलेच्या परिश्रमातून फुलली नैसर्गिक शेती
नागपूर : शेती उत्पादकतेत होणारी सतत घट, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे कमी भाव या पार्श्वभूमीवर समुद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथील शोभाताई गायधने या मागील २१ वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत आहे.
त्यांच्याकडे १५ एकर शेती असून यामध्ये त्या हळद, गहू, तूर, चना, लिंबू, शेवगा व भाजीपाला आदी पीके घेतात. यातून त्यांना वार्षिक ८ लाख रुपयांचा नफा होवू लागला.
निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेवून शेतामध्ये ५० मीटरचे शेततळे तयार केले. यामुळे २४ तास पाणी उपलब्ध झाले. रासायनिक खते आणि किटकनाशकाचा वापर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ लागला. हळदीचे गुणधर्म ग्राहकांना पटवून देण्यासाठी शोभाताई आपल्या शेतामध्ये हळदीचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना हळद उपलब्ध करून देतात. त्यांनी हळदीचे बेणे, कच्ची हळद, कांडी पावडर विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्यांच्या नैसर्गिक शेतीची शासनाने दखल घेवून २०२२ साली त्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले.