धुळ्यात प्रार्थनास्थळाची विटंबना; पोलिसांचे शांततेचे आवाहन
धुळे: शहरातील मोगलाई भागात एका प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने तणाव निर्माण झाला.
पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अधीक्षक संजय बारकुंड यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मोगलाई भागातील गल्ली क्रमांक सातमध्ये हे प्रार्थनास्थळ आहे. विटंबनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संशयितांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी दिले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. आपापल्या भागात शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या घटनेचा राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी समाज कंटकांना तातडीने अटक करून त्यांची धिंड काढावी, अन्यथा मोर्चा काढून धुळे शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील निजामपूर, सोनगीर, चाळीसगाव रोड आणि अन्य ठिकाणी दोन समुहांमध्ये तणाव निर्माण होईल, अशा घटना घडल्याची आठवण त्यांनी करून दिली. धुळ्यातील घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविण्यात आली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल, हे देखील त्यांना सांगण्यात आल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे.