नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
सांगली: नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ३० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी अतिरिक्त सह जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी ठोठावली.
दंड न दिल्यास आरोपीला एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.
मारुती शंकर झोरे (वय ५०) यांने नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र ही बाब लपवली होती. अकरावी प्रवेशाच्या निमित्ताने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी पिडीता तीन महिन्याची गरोदर असल्याचे तपासणीत आढळले. डॉक्टरांना संशय आल्याने पोलीसांना कळवले. चौकशीमध्ये पिडीताचे वय व नाव चुकीचे सांगितले असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीसांनी अधिक चौकशी करता पिडीताने मित्राने बलात्कार केला असल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणीत पिडीताचे म्हणणे आणि वैद्यकीय अहवाल यामध्ये विसंगती आढळून आल्याने पोलीसांनी सखोल चौकशी केली असता खरा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी तपास करुन संशयित झोरे याच्याविरुध्द आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते. डीएनए तपासणी अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यावरुन संशयित आरोपी दोषी असल्याचे सिध्द करण्यात सरकार पक्षाला यश आले. यानंतर न्यायालयाने आज आरोपीला ३० वर्षे सक्तमजुरी व दहा हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.