मुंबई, ठाण्यातून बाहेर गेलेल्या हक्कांच्या माणसांना परत आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे: क्लस्टर योजना केवळ ठाण्यापुरती मर्यादित नसून एमएमआर रिजनमधील धोकादायक तसेच अधिकृत आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही योजना आहे मुंबई,ठाण्यात घर घेण्याची सर्वसामान्य नागरिकांची ऐपत राहिली नाही. अनेकांना घरभाडे देखील मिळत नसून त्यामुळे मुंबई, ठाण्यातून बाहेर गेलेल्या हक्कांच्या माणसांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली आहे. कित्येक पुनर्विकासाचे प्रकल्प राखडले आहेत. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून निधी उभा करून हे प्रकल्प देखील मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी क्लस्टरच्या लोगोचेही अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचा भुमीपुजन सोहळा किसननगर येथे सोमवारी संपन्न झाला. तसेच यावेळी समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटनही शिंदे हस्ते होणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शुंभराज देसाई, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, मला ही स्वप्न वाटत होते की क्लस्टर कसे होणार परंतु आज ते स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आनंद आहे. अनधिकृत, धोकादायक इमारतीसाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही आंदोलन केली, रस्त्यावर लढाई केली, मोर्चा काढला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात याला तत्वत: मान्यता मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम करून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषीमंत्र्यांनी त्वरित प्लॉट दिला.