विदर्भात पावसाची हजेरी
विदर्भातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता काही जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी रविवारी (ता. ४) कोसळल्या. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणातही गारवा निर्माण झाला होता.
विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली.
त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटल्याने अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेली. पावसाच्याही जोरदार सरी काही जिल्ह्यांत कोसळल्याची नोंद आहे. तर काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस झाला. नागपूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. १५ ते २० मिनिटे पावसाच्या सरी कोसळत होत्या. .
शनिवारी ( ता. ३) कडक उन्हाचा पार असताना अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटाने शहरासह तालुक्यातील काही भागात झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता.
तालुक्यातील सार्शी याठिकाणी मोठ्या नुकसानाची नोंद असून कांद्याचे नुकसान झाले आहे. सार्शी येथील पुंडलिक कानबाले, वानखडे यासह इतर नागरिकांचे नुकसान झाले.
शेंदूरजना घाटला पावसाने झोडपले
शेंदूरजनाघाट : शनिवारी दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसात रूपांतर झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेंदूरजनाघाट-तिवसाघाट, रवाळा-वरुड, शेंदूरजनाघाट ते धनोडी या रस्त्यावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली.
झाडे तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तिवसाघाट बसस्टँडवरील जुने पिंपळाचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक बंद होती.