भाव नसल्याने शेतकऱ्याने फरदडीचा कापूस जनावरांना टाकला
अकोला:यंदा कापसाला चांगला दर अत्यंत कमी दिवस मिळाला. दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी अद्यापही कापूस विकलेला नाही. मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यातील कोथळी येथील शेतकऱ्याला फरदडचा कापूस अवघा ४००० रुपये क्विंटल व्यापाऱ्याने मागितला.
त्यामुळे कापूस विकण्याऐवजी या शेतकऱ्याने थेट जनावरांना खाऊ घालण्याचा पवित्रा घेतला. यावरून शेतकऱ्यांचा संताप स्पष्ट होत आहे.
गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने कापूस लागवड वाढली. यंदा मात्र सुरुवातीपासूनच कापसाचा दर दबावात राहत आलेला आहे. वाढलेला व्यवस्थापनाचा खर्च पाहता कापसाला किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल या अपेक्षत शेतकरी होते.
संपूर्ण हंगाम लोटला तरी हा दर मिळू शकला नाही. ८००० ते ९००० दरम्यान कापूस विकला गेला. दर वाढेल या आशेने शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून आहे.
चांगल्या कापसालाच दर नसल्याने फरदडीचा कापूस आणखी कमी दरात व्यापारी मागत आहेत. कोथळी येथील संतोष जोहरी यांना फरदडीच्या क्षेत्रातून सहा ते सात क्विंटल कापूस आला. मजुरांना २५० ते ३०० रुपये मजुरी दिली.
एका मजुराने ८ ते १० किलो कापूस वेचून दिला. हा कापूस विक्रीसाठी व्यापाऱ्याला बोलावले तर त्याने अवघा चार हजार रुपये क्विंटल कापूस मागितला. त्यामुळे जोहरी यांनी हा सौदा अमान्य करीत फरदडीचा कापूस आपल्या बैलजोडी, म्हशींना खायला टाकला.