राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन व्हावे
नवी दिल्ली : संसद भावनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.आगामी 28 मे रोजी संसद भवनाच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. परंतु या निर्णयाला काँग्रेससह 19 विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी आर. जयासुकिन यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद 79 नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे देखील या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच देशाच्या संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात असाही याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
याचिकेनुसार अनुच्छेद 85 नुसार राष्ट्रपती या संसदेचे सत्र बोलवतात. तसेच अनुच्छेद 87 नुसार त्याचं संसदेत अभिभाषण देखील होते, ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सदनांना संबोधित करतात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावे. तसेच याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, गेल्या 18 मे रोजी लोकसभा सचिवांनी संसद भवनाच्या उद्घाटनची जी निमंत्रण पत्रिका जाहीर केली आहे, ती असंवैधानिक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने हे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे असे निर्देश द्यावेत अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आलीय.