बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.२६ टक्के लागला.
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे, तर नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातून ४६,७३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ४६,४५६ जणांनी परीक्षा दिली होती. यातून ४३,३२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणीत ४२९०, प्रथम श्रेणी : १८,२५६, द्वितीय श्रेणी : १७,५१८ आणि उत्तीर्ण (पास) श्रेणी : ३२६३ याप्रमाणे उत्तीर्णांचा निकाल आहे.
परीक्षेत खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एनसीसी, स्काऊट/ गाईडच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या क्रीडा धोरणानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत. ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पूनर्मूल्यांकन याचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. २६ मे ते दि. ५ जूनपर्यंत आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
चार जिल्ह्यात जळगाव प्रथम
जळगाव : ९३.२६ टक्के
नंदुरबार : ९३.०३ टक्के
धुळे : ९२.२९ टक्के
नाशिक : ९०.१३ टक्के